पुणे :आजपर्यंत आपण चोरीचे अनेक प्रकार आपण पाहिले आहे. वेगवेगळ्या फिल्मी पद्धतीने चोरी करणाऱ्या चोरांना देखील आपण पाहिले आहे. पण सोमवारी रात्री सोने तस्करीचा एक विचित्र प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने हे सोने भुकटी स्वरूपात कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविले होते. या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने गुप्तांगात सोने लपवून आणल्याने अधिकारी देखील चक्रावले होते.
सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल :याबाबत अधिक माहिती अशी की, एक महिला दुबईवरून सोने घेऊन येणार असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विमानतळावर चेकिंग वाढवली होती. जेव्हा दुबईचे विमान पुण्यात आले, तेव्हा एक महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर जाताना सुरक्षा रक्षकांना दिसली. यामुळे त्यांचा संशय वाढला आणि त्या महिलेला थांबवून तिची चौकशी सुरू केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचा प्रकार उघडकीस आला. या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. महिलेकडून 20 लाख 30 हजार रुपयांचे 423 ग्रॅम 41 मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.