पुणे PSI Somnath Zende Suspended : पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे एका रात्रीत करोडपती झाल्यानं सर्वत्र चर्चेत आले होते. मात्र आता पुन्हा या पोलीस उपनिरीक्षकांची चर्चा सुरू झाली आहे. बेशिस्त वर्तणूक आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने ( ACP Satish Mane ) यांनी दिली आहे.
सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रूपयांचं बक्षिस :सोमनाथ झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयातील आरसीपीमध्ये नेमणुकीस आहेत. मंगळवार 10 ऑक्टोबरला ड्युटीवर असताना त्यांनी बांग्लादेश विरुद्ध इंग्लंडच्या क्रिकेट मॅचवर एका ऑनलाईन गेम अॅपवर टीम लावली होती. काही वेळातच त्यांनी लावलेली टीम अव्वल येत त्यांना दीड कोटीचं बक्षीस लागलं होतं. सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रूपयांचं बक्षिस लागलं असून ते एका दिवसात कोट्याधीश झाले आहेत. सर्वत्र प्रसिद्धी मिळल्यानंतर मात्र सोमनाथ झेंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांच्यावर पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. आता या चौकशीचा अहवाल आल्यानंतर सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस खात्याची प्रतिमा केली मलीन :पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी प्राथमिक चौकशीनंतर पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केली. त्यामुळे बेशिस्त वागणूक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली आहे. त्याचबरोबर सोमनाथ झेंडे यांची पुढील विभागीय चौकशी पोलीस उपायुक्त बापू बांगर ( DCP Bapu Bangar ) यांच्याकडं सोपवण्यात आल्याची माहितीही माने यांनी दिली आहे.