पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत बोलताना देशाच्या फाळणीसाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले होते. नेहरूंनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी फाळणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा असेही चव्हाण म्हणाले.
पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. केंद्र सरकार गोंधळलेले आहे. हाताबाहेर गेलेल्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी सरकारला काही करता आले नसल्याचे चव्हाण म्हणाले. नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशभरात सुरू असलेले आंदोलन पाहता असे काही होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. या दुहेरी कचाट्यात सध्या देश सापडलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यापूर्वी एक लोकशाही देश म्हणून, अग्रणी देश म्हणून आपण मार्गक्रमण करत होतो. पण आता आंतरराष्ट्रीय नियतकालिके आपल्यावर टीका करीत आहेत. या सर्वाला मोदी जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.