एल्गार परिषद खटला : पोलिसांनी जप्त केलेला इलेक्ट्रॉनिक डाटा आरोपींना मिळणार; न्यायालयाचा निर्णय
एल्गार परिषदेच्या खटल्यात जप्त करण्यात आलेला इलेक्ट्रॉनिक डाटा उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या प्रकरणात संशयित आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला होता. हा इलेक्ट्रॉनिक डाटा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर खटल्यातील आरोपी सुरेंद्र गडलिंग आणि अरुण परेरा यांनी खटल्यात जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डाटाची मिरर इमेज मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
पुणे- एल्गार परिषदेच्या खटल्यात जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डाटाची मिरर इमेज मिळावी म्हणून आरोपींनी न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर आज (शुक्रवारी) सुनावणी करत न्यायालयाने आरोपींची ही मागणी मान्य केली आहे.
या सुनावणीबाबत बचाव पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या प्रकरणात संशयित आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला होता. हा इलेक्ट्रॉनिक डाटा तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला आहे. त्यानंतर खटल्यातील आरोपी सुरेंद्र गडलिंग आणि अरुण परेरा यांनी खटल्यात जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डाटाची मिरर इमेज मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला असून, सरकारी पक्षाला न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डाटाची मिरर इमेज आरोपींना उपलब्ध करून देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे नाझर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या इलेक्ट्रॉनिक डाटाचा पंचनामा करणार आहे. त्यानंतर या इलेक्ट्रॉनिक डाटाची मिरर इमेज संबंधित संशयित आरोपींना उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे बचाव पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.