पुणे Prithviraj Chavan on Reservation : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान केली. त्यानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा जीआर काढलाय. यावरून काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आक्रमक होत राज्य शासनाला छत्रपतींचा पुरावा मान्य नाही तर निजामचे पुरावा (Nizam evidence) तुम्हाला मान्य आहेत अशा शब्दात सरकारवर टीका केलीय (Prithviraj Chavan on Maratha Reservation).
50 टक्क्यांवर आरक्षणाचा कोटा -कॉंग्रस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्तानं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन केलंय. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशभरातील तसंच राज्यातील विविध विषयावर भाष्य केलं. ते म्हणाले की, 50 टक्क्यांवर आरक्षणाचा कोटा वाढवता येणार नाही अशी गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र मोदी सरकारने ईडब्ल्यूआरएस आरक्षण आणून गाईड लाईनचं उल्लंघन करत आरक्षण 60 टक्क्यांवर नेलं. आज केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे. जर मोदी असं करु शकतात तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त आरक्षण करण्यासाठी सरकारने घटना दुरुस्तीची तयारी करावी त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मी माझ्या कारकिर्दीत अतिरिक्त आरक्षण दिलं होतं तसा अध्यादेश देखील काढला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मात्र जर असं होत नसेल तर शिंदे सरकारने आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगावं, समाजाची दिशाभूल करु नये अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केलीय (Maratha reservation controversy).