पुणे - शिरुर तालुक्यातील वाबळेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा ही देशातली पहिली आणि जगातली तिसऱ्या क्रमांकाची 'झिरो एनर्जी शाळा' ठरली आहे. राज्यातली पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या अथक प्रयत्नातून एका पडक्या शाळेचे रुपातर झिरो एनर्जी स्कुलमध्ये झाले आहे. आज हीच शाळा जगातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्थान बनली आहे.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. 2012 साली दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती, देन शिक्षक आणि 32 विद्यार्थी अशी या शाळेची अवस्था होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. पै पै गोळा करून संसार उभा करावा लागतो, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शाळा उभा करत शाळेचा कायापालट केला आहे.
जिल्हा परिषदेची पडकी शाळा ते देशातील पहिली 'झिरो एनर्जी स्कुल' हेही वाचा -शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक
या शाळेविषयी सांगताना वारे गुरुजी म्हणाले की, जिल्हा परिषदेची शाळा म्हटले की, आपल्याला काही मर्यादा असतात. परंतू अशा परिस्थितीतही आपण सर्वोत्तम काम करू शकतो. त्याद्वारे आपण शहरात किंवा परदेशात ज्या दर्जाचे शिक्षण दिले जाते त्य दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना देवू शकतो. या उद्देशातून हे काम सुरु झाले. दरम्यानच्या काळात शाळेत काही चांगले उपक्रम राबवले गेले. त्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर शाळेत खुप सारे प्रवेश होवू लागले आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. 'आर्ट ऑफ लिव्हींग आणि बॅक ऑफ न्यूयॉर्क' च्या मदतीने ही शाळा उभी राहिल्याचे वारे गुरुजी सांगतात.
हेही वाचा -जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'
आज घडीला या शाळेत 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संबंध जिव्हाळ्याचे आहेत. विषय मित्र सारखी संकल्पना या शाळेत राबविली जाते. यामध्ये विद्यार्थी एकमेकांना शिकवतात आणि आपल्या शंकांचे निरसन करतात. या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढील दोन वर्षांचे प्रवेश पूर्ण झाले असून चार हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत. तर दुसरीकडे या शाळेचा दर्जा आणि शिक्षण पद्धती पाहण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून शिक्षक, अधिकारी, पालक शाळेला भेटी देत आहेत. अनेक राज्य सरकारे झिरो एनर्जी स्कूलचे मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याच्या तयारीत आहे.