पुणे - जिल्ह्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्ण कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी पावसाळयापूर्वी करुन घ्यावी. धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी. पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्टया व इतर धोक्यांच्या ठिकाणाचा अभ्यास करुन त्याची माहिती घेऊन नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. जुन्या इमारती, वाडे बांधकामांची तपासणी करावी. पावसाळयापूर्वी सर्व रस्त्यांचे पट्टे भरुन घ्यावेत. तसेच महामार्गालगत, रस्त्यालगत उत्खननामुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित करणे. जिल्हा शल्यचिकीत्सकांनी व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.