पुणे- काँग्रेस-राष्ट्रवादीची घराणेशाही, भ्रष्टाचार, वैचारिक दिवाळखोरी यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सेना महायुतीला ऐतिहासिक यश मिळेल. युती 221 पेक्षा जास्त जागा जिंकून नवा विक्रम करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. येत्या 18 ऑक्टोबरला रामजन्मभूमी खटल्याची सुनावणी आहे. यानिमित्ताने राम मंदिर पाहिजे की नको? याबाबतची भूमिका काँग्रेसने जाहीर करावी, अशी मागणी यावेळी जावडेकर यांनी केली.
प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री हेही वाचा - खेड-आळंदीत अपक्षांसाठी सरसावली भाजप... नगराध्यक्षांसह नगरसेवक उतरले प्रचारात
यावेळी जावडेकर म्हणाले, काँग्रेस दिवाळखोरीत निघाली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रापुरती उरली आहे, तर 25 जागा लढवणारा पक्ष महाराष्ट्र्रात विरोधी पक्ष करा, म्हणून सांगतोय अशी विनोदाची परिस्थिती आल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तर जे नेते काँग्रेसमधून भाजपत आले ते सर्व चांगले आहेत, असे सर्टीफिकेट जावडेकर यांनी आयरामांना दिले.
आरे वृक्षतोडीसंदर्भात विचारले असता, विकास आणि पर्यावरण यांची सांगड आवश्यक आहे. आम्ही 5 झाडे कापली तर 25 झाडे लावत आहोत, असे सांगत त्यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले. राष्ट्रवाद हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत असतो, असे म्हणत जावडेकर यांनी विधानसभा निवडणुकीत कलम 370 चा मुद्दा असण्याचे समर्थन केले. बिग बॉसचे प्रसारण बंद करावे, अशी मागणी करणारे पत्र आले आहे. त्या कार्यक्रमात काही आक्षेपार्ह आहे का? याचा अभ्यास प्रसारण खाते करणार असून त्याचा अहवाल देणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिली.
हेही वाचा - शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली