पुणे- सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्का, तसेच एनआयए अंतर्गत अटक झाली पाहिजे. ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी. अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
एका वेबसाईटला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.