पुणे- १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलाव्या व उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा विद्यार्थी परिषदेतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी ही मागणी केली.
माहिती देताना आमदार विनायक मेटे मेटे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे ५ एप्रिल व २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सद्यपरिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खेड्यापाड्यांपर्यंत हे लोण पसरलेले आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य व अनेक विद्यार्थीही कोरोना ग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करून देखील परीक्षा देणे शक्य होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिका व कोचिंग कलासेस बंद असल्यामुळे विद्यार्थी योग्य ती तयारी करू शकलेले नाहीत.
तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. अशा विद्यार्थ्यांजवळ, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे, विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करू शकले नाहीत. असे असताना सरकार आडमुठेपणा करून परिक्षा घेत आहे. मराठा समाजातील जी नेते मंडळी ही परीक्षा होऊ द्यावी असे म्हणतात त्यांना आमचे भविष्य खराब करायचे आहे का? आमच्या भविष्यापेक्षा त्यांना कोणाची जास्त काळजी आहे, क्लासेस वाल्यांची, इतर समाजाची की सरकारची काळजी आहे, हे स्पष्ट करावे. आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी अशी चुकीची भूमिका घेऊ नये. अशी भावना विनायक मेटे यांनी व्यक्त केली.
मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असे केल्यास काय होते हे आम्ही सरकारला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, मायबाप सरकारने या परीक्षा पुढे ढकलाव्यात. शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा घेऊन मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करू नये. परिक्षा जर पुढे ढकलल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
हेही वाचा-'हे अमर-अकबर-अँथनीचे सरकार, एकमेकांच्या पायात पाय अडकूनच ते पडणार'