पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचे जन्म स्थान असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा आयोजित केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी निवडक नागरिक व शिवभक्तांना गडावर प्रवेश दिला जात आहे. शिवजन्म सोहळ्याला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजता गडावरील शिवाई मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. शिवजन्म सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांना वंदन करत 'महाराष्ट्राच्या घराघरात अन् मनामनात, शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे...', अशी भावना व्यक्त केली आहे.
किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शिवाई देवी मंदिरात शासकीय पूजा संपन्न
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मराठा साम्राज्याचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला संदेश -
“महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यांना मानाचा मुजरा, त्रिवार वंदन करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची आज जयंती आहे. स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला मी वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा शक्तीला, आधुनिक मावळ्यांना मी वंदन करतो. महाराष्ट्रातल्या तमाम बंधु-भगिंनीना, जगभरातल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊदे, असं आवाहन करतो.” असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.