महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बैलगाडा शर्यत बंदीची लढाई लोकसभेच्या रणांगणात सुरू - बॉलीवूड

बैलगाडा शर्यत बंदीवरून पुण्यात राजकारण सुरू झाले आहे.

बैलगाडा शर्यत बंदीवरून पुण्यात राजकारण

By

Published : Apr 1, 2019, 5:01 PM IST

Updated : Apr 1, 2019, 9:09 PM IST

पुणे- जत्रा-यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत. मात्र, ही बैलगाडा शर्यत मागील अनेक दिवसांपासून बंद पडली आहे. मात्र, या बैलगाडा शर्यत बंदीची लढाई आता लोकसभा निवडणुकीत सुरू झाली आहे. नागरिकांचा भावनिक प्रश्न हाती घेऊन राजकारण सुरु झाले आहे. पाहुयात यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट.

बैलगाडा शर्यत बंदीवरून पुण्यात राजकारण - स्पेशल रिपोर्ट

बैलगाडा घाटात मालकाचे नाव उंचावून ठेवणारे ही बैलगाडा शर्यत आता बंद पडली आहे. त्यामुळे जत्रा-यात्रामधील आनंद हा हरवत चालला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत ही उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा एक भावनिक प्रश्न बनला आहे. याच प्रश्नाला आता राजकीय नेते हात घालून एकमेकांवर आरोप करू लागले आहेत.

बैलगाडा शर्यत बंदीची लढाई न्यायालयात सुरू असताना बैलगाडा घाट ओस पडत चालले आहे. मात्र, ही शर्यतबंदी आघाडी सरकारच्या काळात लागली. तर सध्याच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडुनच या शर्यतबंदीचे भांडवल केले जात आहे.

तमिळनाडू राज्यामध्ये जल्लीकट्टूला बंदी आल्यानंतर राज्यभरात संपूर्ण टॉलीवूड रस्त्यावर उतरून जल्लीकट्टू सुरू करण्याची मागणी केली. मात्र, महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत बंद असताना एकही अभिनेता या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मानल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यत विरोधात उतरला नाही. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे सध्या बैलगाडा सुरू होणारच असे सांगत आहेत. तसेच पहिल्या घाटात घोड्याचा लगाम मीच धरणार, असे भावनिक आव्हानही करत आहेत.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील अभिनेता डॉ. अमोल कोल्हे सध्या प्रत्येक नागरिकाचे एक वेगळे आकर्षण बनले आहे. त्यामुळे त्यांनी बैल घाटात येऊन राजकारण न करता नागरिकांचे मालिकेच्या भूमिकेतुन मनोरंजन करा, असा खोचक सल्ला खासदार आढळराव पाटील यांनी दिला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा आपणच लावणार, यासाठी नागरिकांच्या या भावनिक शर्यतीला राजकीय भांडवल केले जात आहे. मात्र, सामान्य माणसाची ही बैलगाडा शर्यत आजही बंद आहे. तसेच घाटाचा सर्जा-राजा गोठ्यात बंद आहे. त्यामुळे बंद झालेली बैलगाडा शर्यत ही कधी सुरू होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.

Last Updated : Apr 1, 2019, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details