पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना टिळक कुटुंबीयांना डावलले आहे. यावर ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षावर नाराज असून, ब्राह्मण समाजाची नाराजी काही थांबायला तयार नाही. सुरुवातीला कसब्यात 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला... टिळकांचा मतदारसंघ गेला... आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते.
सूचक विधानांची पोस्टरबाजी :आता परत नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरा शेजारी असाच एक फलक लागला आहे. आता हा फलक ब्राह्मण समाजातील कोणत्या मंडळींनी लावला किंवा भाजपच्या विरोधकांनीच लावला यावर आता चर्चा घडत आहेत.कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा आणि तोच आमच्याकडून काढला, आता आम्ही दाबणार नोटा, असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. या फलकावर एका बटूचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. त्यातून योग्य तो संदेश जाईल, याची दक्षता घेण्यात आली आहे.
ब्राह्मण मतदार संख्या :कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाज हा 13 ते 15 टक्के असून, त्यांची एकूण संख्या ही सुमारे 30,000 पर्यंत आहे, असे सांगण्यात येते. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातील व्यक्तींना उमेदवारी नाकारत आणि त्या जागी हेमंत रासने यांना भाजपने संधी दिली. तेव्हापासून असे फलक वारंवार लावण्यात येत आहेत ब्राह्मण समाजाला डावलले म्हणून हिंदू महासंघाचे आनंद दवे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांना पाठिंबा देण्याची भाषा करण्याऐवजी आम्हाला कोणताही उमेदवार पसंत नाही, असे दाखवत नोटाची बटणे दाबणार असल्याचे हा फलक सांगत आहे.