पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगरात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिला.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई -
नाईट कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी काही नागरिकांनी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खाल्ल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे काही नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या सर्व नाट्यमय घडामोडी सांगवी परिसरातील काटे पुरम चौका बघायला मिळाल्या. संचारबंदीचे नागरिकांकडून उल्लंघन झाल्याचे यावेळीृ दिसून आले. अनेकांनजण विनामास्क घराबाहेर पडले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात नाईट कर्फ्यू -
अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून पुणे जिल्ह्यात सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा प्रशासनाकडून आले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील प्रत्येक चौकात नाकाबंदी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
नागरिकांनी सहकार्य न केल्यास लॉकडाउन -
पुढील सहा दिवस नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असून ते केल्यास लॉकडाऊन ची परिस्थिती उदभवू शकते असे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी च्या वेळी घराबाहेर न पडता पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात रात्री संचारबंदी; शाळा-महाविद्यालयांत होणार तपासणी