पिंपरी-चिंचवड (पुणे) - चाकणमध्ये पोलिसानेच 27 लाखांचा दरोडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 सप्टेंबरच्या रात्री 27 लाखांचा दरोडा पडला होता. यात पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या पोलिसाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तत्काळ निलंबित केले आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणारी ही घटना असून दरोड्याचा कट आरोपी पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर याने रचल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा; संभाजी ब्रिगेडचे नांदेड-हैदराबाद रस्त्यावर रास्तारोको..
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून विनोद ठाकरे (वय 28), जितेंद्र रामभवन श्रीवास (वय 30), रियाज अमीन इनामदार (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 लाखांचे वाहनांचे सुटे पार्ट घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तेव्हा, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून या दरोड्याचा मास्टरमाईंड हे पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.