कोरेगाव भीमा (पुणे) - शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा येथे एका वाईनशॉप मालकाने महागडी नवीन कार घेतली. या कारची मोठ्या धुमधडाक्यात पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय आहे -
कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील वाईनशॉप मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांनी नुकतीच महागडी नवीन कार घेतली. सध्या लॉकडाऊन तसेच गर्दी करण्यास बंदी असताना देखील त्यांनी सदर कारचे धुमधडाक्यात गर्दी करून कारचे पूजन केले. तर यावेळी अनेकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते तर गर्दी देखील केलेली होती. कारची पूजा झाल्यानंतर सदर पूजेचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाले. त्यांनतर कोरेगाव भीमा तलाठी जयमंगल धुरंदर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने गाडी मालकासह दहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.