पुणे- वाकड आणि नेहरूनगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी बेड्या घालून आरोपींची धिंड काढली होती. त्यापाठोपाठ पिंपरी पोलिसांनीही आरोपींची धिंड काढली आहे.
तोडफोड प्रकरणी आशिष जगधने (वय ३१), इरफान शेख (वय ३०), जितेश मुंजळे (वय २८), जावेद औटी (वय २९), आकाश हजारे (वय ३०) यांच्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर १४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींसह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश सुभाष जाधव (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.