पुणे -हलगी आणि गाण्यांवर ठेका धरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात पोलीस कर्मचारी गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचताना दिसत आहेत. संबंधित व्हिडिओ हे पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचे आहेत.
गणेशोत्सवात २४ तास कर्तव्यावर असणारे पोलीस काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्पर राहतात. गुरुवारी सार्वजनिक गणपती विसर्जनासोबतच हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे देखील विसर्जन करण्यात आले. यावेळी, मराठी गाणे आणि हलगी वादनावर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता.