पुणे - आपल्या विविध मागण्यांसाठी कर्णबधीर विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाज कल्याण विभाग कार्यालय ते विधिमंडळ असा मोर्चा काढला होता. या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांकडून हा मोर्चा काढला जात होता. लाठीचार्ज कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजले नाही.
कर्ण-बधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे. सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मागण्या सांगताना मोर्चेकरी म्हणाले की, महाराष्ट्रात १८ लाख कर्णबधीर आहेत. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात आम्ही अपंग किंवा अंध नसून कर्णबधीर आहोत. आमची भाषा समजू शकणारे लोक खूप कमी आहेत. आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना, भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही.
आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत. अजूनही आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला नसून सौम्य बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे.
आंदोलक मूकबधीर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सरकारने त्वरीत पावले उचलली नाहीत तर मुंबईला चालत जाऊन मोर्चा काढण्याचे आंदोलकांनी ठरवले आहे. मूकबधिरांना शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.