पुणे - राज्यातील शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील भामा-आसखेड धरणग्रस्त आपल्या हक्काचे पाणी व पुनर्वसनासाठी मोठा लढा देत आहेत. शुक्रवारी या धरणग्रस्त कृती समितीच्या १० जणांना प्रतिबंधात्मक कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील यांना कलम १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आली. संपूर्ण भामा खोऱ्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मागील ३० वर्षांपासून भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या हक्काच्या पुर्नवसनासाठी लढा देत आहेत. जमिनीला जमिन द्या, अशी मागणी करत तीन महिन्यांपूर्वी आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनात एका धरणग्रस्ताने जलाशयात जलसमाधी घेतली होती. या शेतकऱ्यानी जलसमाधी आंदोलनाला बळ दिले. मात्र, हक्काची लढाई लढत असताना धरणग्रस्त शेतकरी गुन्हेगार नाहीत. जगून हा लढा करा, मरणाने तुमचा प्रश्न सुटणार नाही, असे आवाहन स्मार्थना पाटील यांनी धरणग्रस्तांना केले आहे.