पुणे- देशाला स्वर्णयुगाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. स्वप्न जागेपणी बघा आणि ती खरी करण्यासाठी भरपूर मेहनत घ्या, असा उद्योजकांना सल्ला पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिला. ते पोलीस पाल्यांसाठी आयोजित उद्योजकता परिचय कार्यशाळेत बोलत होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व पुणे जिल्हा विकास केंद्र यांच्या सहकार्याने पोलीस पाल्यांसाठी उद्योजकता परिचय कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, की आपल्यातील उर्जेला योग्य दिशा द्या. अनावश्यक आणि इतर गोष्टींवर खर्च करु नका, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमांतर्गत अधिकाधिक उद्योजक निर्माण व्हावे यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे. कार्यशाळेला मुलांच्या उपस्थितीचे त्यांनी विशेष कौतुक केले. नियोजन करून कार्यतत्पर होण्यावर जास्त भर देण्याचे आवाहन कृष्णप्रकाश यांनी पाल्यांना केले.
उद्योजकता परिचय कार्यशाळा
पोलीस कर्मचारी नेहमी जनसेवा करतात...
आयुक्त कृष्णप्रकाश पुढे म्हणाले की, पोलीस कर्मचारी नेहमी जनसेवा आणि राष्ट्रसेवेत मग्न असतात. त्यामुळे त्यांना पाल्यांना अधिक वेळ देता येत नाही. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना उद्योग सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. फक्त मार्गदर्शन मिळाले म्हणजे उद्योग यशस्वी होईल असे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
स्वप्न जागेपणी बघा आणि खरी करण्यासाठी मेहनत घ्या-
स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिकाटीने मेहनत करावी लागेल. नेहमी कार्यतत्पर राहून उद्योग सिद्धिस घेऊन जाता येतो, असे कृष्णप्रकाश यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला औरंगाबाद एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंधाळकर, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. तसेच पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, सिटिझन फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे, महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे प्रशिक्षक, पोलीस कर्मचारी व त्यांचे पाल्य उपस्थित होते.