पुणे - बारामती शहरात होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांना घराबाहेर फिरू देऊ नये, असे एका युवकाकडून सांगण्यात येत होते. त्याचा राग धरून त्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलीस पथकावरही जोरदार हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेमध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह 3 अधिकारी आणि 6 कर्मचारी जखमी झाले. अनेकांच्या हाताला मार लागला असून काहींच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत. तसेच काही जण दगडफेकीत जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर बारामतीच्या सिल्वर ज्युबली रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुपारी चारच्या सुमारास बारामती शहरातील जळोची येथे ही घटना घडली. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, फौजदार पद्मराज गंपले व योगेश शेलार, पोलीस कर्मचारी पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, पोपट नाळे, महिला पोलीस कर्मचारी रचना काळे व स्वाती काजळे असे एकूण 9 जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सध्या घटना घडलेल्या परिसरातील वातावरण शांत असून या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. एका वयोवृद्ध महिलेचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे, असा बनाव करून स्थानिक महिला पोलिसांच्या अंगावर चाल करून आल्या आणि त्यांनी पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेत पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी युवकांनी पोलिसांवर दगडफेकही केली.