पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात दहशत पसरवणारा रावण टोळीतील कुख्यात गुंड आणि त्याच्या साथीदाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. विकी उर्फ अनिरुद्ध राजू जाधव (वय- 24, रा. रावेत, पुणे) आणि मन्या उर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय- 22 रा. रावेत, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विकी जाधव हा रावण टोळीचा म्होरक्या असून चार वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणातील फरार आरोपी होता. त्याला आज अटक करण्यात आली आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. कुख्यात गुंड विकीवर आर्म्स अॅक्टसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
रावण टोळीतील कुख्यात गुंडाला साथीदारासह अटक; गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत - चिचंवड पोलिसांकडून रावण टोळीतील दोघांना अटक
चार वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणातील आरोपी रावण टोळीचा म्होरक्या विकी जाधव याला त्याच्या साथीदारासह चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पकडली आहेत. विकी जाधववर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळीचा मोरक्या विकी आणि साथीदार मन्या हा चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रावण टोळीचा मोरक्या विकी याच्याकडे गावठी पिस्तुल मिळून आली असून साथीदार मन्याकडे दोन जिवंत काडतुसे आढळली आहे.
दरम्यान, विकी हा दरोड्यातील फरार आरोपी असून गेल्या चार वर्षांपासून चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर विकीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, भाऊसाहेब मोईकर, स्वप्नील शेलार, ऋषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पंकज भदाणे, नितीन विठ्ठल राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने केली आहे.