पुणे -पुण्यातील सुस खिंडीत शनिवारी सकाळी सुदर्शन पंडित (वय 30) या तरुणाचा मृतदेह सापडला होता. गळा चिरल्यानंतर दगडाने वार करून हा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लागला असून पोलिसांनी याप्रकरणी एका तृतीयपंथी व्यक्तीला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी रविराज क्षीरसागर (वय 35) या तृतीयपंथीयाला अटक केली आहे. तर, सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पंडित यांचा चुलत भाऊ संदीप (वय 34) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत सुदर्शन हा पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) पीएचडी करत होता.
डेटिंग साईटवर ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविराज क्षीरसागर आणि मृत सुदर्शन पंडित यांची डेटिंग साईटवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ते सुस खिंडीत भेटले होते. या ठिकाणी त्यांच्या काही कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर रागाच्या भरात रविराजने सुदर्शनचा गळा चिरला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता.
शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना सुस खिंडीत मृतदेह दिसला. नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या खिशात असलेल्या पाकिटातील कागदपत्रावरून पंडीत यांची ओळख पटली होती.
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान, आरोपी रविराज क्षीरसागर याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता, त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.