पुणे :मागील महिन्यात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यावर कारवाई करण्यात आली होती. आता अशीच एक नवीन घटना समोर आली आहे. तरुणींकडून स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलालास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पिंपरी- चिंचवडच्या सांगवी परिसरात करण्यात आली आहे. 'जास्मिन फॅमिली स्पा' या ठिकाणी छापा टाकून दोन तरुणींची सुटका अनैतिक मानवी वाहतूक विभागाने केली आहे. दलाल कुणाल राममूर्ती रेड्डी (वय- 39) याला पोलिसांनी अटक केली आहे.
दोन तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका :पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पोलिसांच्या नजरेआड स्पाच्या नावाखाली सर्रास वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे अनेकदा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग यांनी उजेडात आणले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरांमधील नवी सांगवी येथे 'जास्मिन फॅमिली स्पा' या ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अनैतिक मानवी वाहतूक विभाग यांनी डमी ग्राहक पाठवून जास्मिन स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे की नाही, याची खात्री करून घेतली. त्या ठिकाणी छापा टाकून दोन तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केले आहे.
महिला आरोपी फरार : याप्रकरणी दलाल कुणाल राममूर्ती रेड्डीला अटक करण्यात आली आहे. तर महिला आरोपी फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूकचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सागर सूर्यवंशी, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या टीमने केली आहे.