बारामती - बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच पिस्तुलांसह दहा जिवंत काडतुसे जप्त करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
बेकायदेशीर पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, बारामती तालुका पोलिसांची कामगिरी आरोपींची नावे -
हनुमंत अशोक गोलार (वय - २२वर्षे, रा.जवळवाडी खरवंडी कासार, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अल्ताफ सज्जाद पठान (वय- ३० वर्षे, रा नाईकवाडी मोहल्ला, ता. शेवगाव, जि.अहमदनगर), संतोष प्रभाकर कौटुंबे (वय ३८ वर्षे, रा मारवाड गल्ली ता.शेवगाव, जि.अहमदनगर), जफर अन्सार इनामदार (वय २८, रा. नाईकवाडी मोहल्ला, ता. शेवगाव, जि.अहमदनगर) जावेद मुनीर सय्यद (वय- २२ वर्षे, रा.आखेगाव रोड भापकरवस्ती, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे हस्तगत -
मागील आठवड्यात बारामती तालुका पोलीस ठाण्यात एका जबरी चोरीतील आरोपीकडे विनापरवाना पिस्तुल मिळाले होते. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने त्याच्या इतर मित्रांकडेही विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती दिली होती. त्यावरून सदर आरोपीच्या मित्राकडून ७ पिस्तूल व १० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आरोपी बेकायदेशीर पिस्तूल विक्री करण्यासाठी बारामतीत येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आणखी ५ पिस्तूल व १० जिवंत काडतुसे मिळून आली. बारामती तालुका पोलिसांनी चालू वर्षात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करून १२ पिस्तूल व २० जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
या धडाकेबाज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली कामगिरी -
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रेय मदने, यांनी केली.