पुणे- शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २०२० मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला कोविड सेंटर मध्ये दाखल केले होते. तेथून तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. या आरोपीला पकडण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला श्वान पथकाच्या मदतीने यश आले आहे. सौरभ उर्फ सौऱ्या ड्रायवऱ्या भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुण्यात कोविड सेंटर मधून पळालेल्या आरोपीला श्वान पथकाच्या मदतीने अटक
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २०२० मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याला कोविड सेंटर मध्ये दाखल केले होते. तेथून तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून गेला होता. या आरोपीला पकडण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला श्वान पथकाच्या मदतीने यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या वाजेवाडी येथे २०२० मध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला सौरभ उर्फ सौऱ्या भोसले याला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ९ मे रोजी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याची रवानगी येरावडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत केली होती. मात्र न्यायालयाच्या नियमानुसार पोलिसांनी सदर आरोपीची कोरोना चाचणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्याला कोंढापुरी येथील शासकीय कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र २१ मे रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मिलिंद देवरे, लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड शुभम निर्मळ, विजय पोकळे हे कोंढापुरी येथील शासकीय कोविड सेंटर या ठिकाणी बंदोबस्त करत असताना दुपारी एकच्या सुमारास आरोपी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन भिंतीवरून उडी मारून पळून गेला होता.
याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, विक्रम साळुंके यांसह आदींनी कोंढापुरी येथे धाव घेत होमगार्ड व ग्रामस्थांच्या मदतीने कोविड सेंटरच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात व इतरत्र श्वान पथक व ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पळालेला आरोपी ऊसाच्या शेतात आढळला. यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मिलिंद दिलीप देवरे (वय ३३ वर्षे) रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांनी सौरभ उर्फ सौऱ्या ड्रायवऱ्या भोसले (वय २१ वर्षे) रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काशिनाथ गरुड हे करत आहे.