पुणे -जिल्ह्यातील देहूगाव येथील इंद्रायणी नदी पात्रात ज्या तरुणाचा मृतदेह आढळला त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. दारू प्यायल्यानंतर वाद झाल्यामुळे त्या तरुणाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
सुनिल रामराव मरजकोले (३५), असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला होता. त्यावेळी देहूरोड पोलीस खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत होते. सुनील कुठे राहत होता? याबाबत पोलीस चौकशी करत असताना टायगर, पवन, महेंद्रसह आणखी एक व्यक्ती सुनीलसोबत राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे (वय-१९), पवन किसन बोरोले (वय-२६), महेंद्र विजय माने (वय-३८) या तिघांना सांगुर्डी फाटा येथून ताब्यात घेतले, तर चौथा आरोपी सचिन फरार झाला. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता टायगरने गुन्ह्याची कबुली दिली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.