पुणे:पीएमपीएमएलच्या ठेकेदार असलेल्या ओलेक्ट्राओलेक्ट्रा (ई-बस), ट्रॅव्हल टाईम (सीएनजी), अँथोनी (सीएनजी), हंसा (सीएनजी) या ठेकेदार असलेल्या कंपन्यांनी संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पीएमपीएमएल प्रशासनाने बिले न दिल्याने या ठेकेदारांनी संपाचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील खाजगी बस ठेकेदारांनी दुपार पाळीत अचानक केलेल्या संपाबाबत पीएमपीएमएल प्रशासन म्हणाल की खाजगी बस पुरवठादारांनी अचानक संप केल्यामुळे दुपार पाळीमध्ये १४२१ बसेस पैकी १२३ बसेस मार्गावर उपलब्ध झाल्या.
प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी: मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा. लि. मे. एन्टोनी गॅरेजेस प्रा. लि. मे हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि. व मे. ओहा कम्युट प्रा. लि. यांनी संपात सहभाग घेतलेला आहे. दोन्ही महानगरपालिका यांचेकडुन निधी उपलब्ध होणेबाबत मागणी केलेली आहे. तसेच 17 मार्च पर्यंत संबंधित ठेकेदारांचे बिल अदायगी करण्यात येत असल्या बाबतचे पत्र 3 मार्च रोजी परिवहन महामंडळाकडून देण्यात आलेले आहे. तसेच उद्या मार्गावर १२५ बसेस उपलब्ध होणार असून विद्यार्थी/प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही याबाबतचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे, असे यावेळी चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे यांनी सांगितले आहे.
पीएमपीएमएलच्या ताफ्यात किती बसेस? पीएमपीएमएलच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. त्यापैकी 1100 बस ठेकेदारांच्या आहेत. तर पीएमपीच्या स्वमालकीच्या 900 बस आहेत. पीएमपीचे बसगाड्या पुरवठा करणारे 2 ठेकेदार वगळता उर्वरित 4 ठेकेदारांनी हा संप पुकारला आहे.