पुणे : पुणेकरांना पीएमपीएमएल रस्त्यावर बंद पडणे हे काही नवीन नाही. आज सकाळच्या सुमारास पीएमपीएमएल बसचा अपघात झाला आहे. वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा पीएमपीएमएलच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. या अपघातामुळे प्रवाशांना संतोष माने दुर्घटनेची आठवण झाली. यावर मात्र पीएमपीएमएल प्रशासनाकडून उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत.
वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत : आज सकाळच्या सुमारास हडपसर डेपो येथून प्रवाश्यांना घेऊन गाडी निघाली असताना जेव्हा हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक, रेल्वे क्रॉसिंग जवळ आली, तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने बस ही विरुद्ध दिशेने नेली. वाहनचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे कळाल्यावर बसमध्ये बसलेल्या गणेश काळसाईत, मयुर बोराडे या दोन तरुणांनी लगेच स्टेरिंग हातात घेत बसवर ताबा मिळवला आहे. यानंतर डेपो मॅनेजर अत्तार यांच्याशी संपर्क साधला असता सदर गाडी व वाहनचालक हा कंत्राटदारांकडून असल्याचे समजले.
छोट्या- मोठ्या अपघाताची मालिका :या आधी पुणे शहरात काही वर्षांपूर्वी असेच संतोष माने याने एसटी महामंडळाची बस घेऊन अपघात केल्याची घटना घडली होती. आज पुन्हा अशी काही घटना घडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा बेजबाबदार वाहनचालकांमुळे आणखी किती दुर्घटना घडणार आहेत, यास जबाबदार कोण? या घटनेस संबधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे. पीएमपीएमएल बसच्या छोट्या- मोठ्या अपघाताची मालिका रोज कुठे ना कुठे होत असते. यात सर्व सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. तरी पीएमपीएमएल प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
हेही वाचा :
- Beed Accident News: बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत दुचाकी घुसल्याने अपघात; अपघातात तीन महिला जखमी
- Tanker Accident: बीआरटी रस्त्यावर टँकरचा मोठा अपघात; ऑइल गोळा करण्यासाठी नागरिकांनी केली एकच गर्दी
- Train accident - इस्ट कोस्ट रेल्वेने काही गाड्या केल्या रद्द, काहींचे मार्ग बदलले तर काही गाड्या आंशिक रद्द