पुणे - शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या 8 महिन्यांनंतर आता रुग्णवाढीचा दर कमी झाला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढल्याने पुणेकरांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.
राज्यात कोरोना संसर्गाची सुरुवात ही पुणे शहरात झाली होती. कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्चला पुण्यात आढळला होता आणि त्यानंतर रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. एप्रिल-मे काळात संसर्गाचा वेग वाढत होता आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना साथीच्या फैलावाने कळस गाठला. दररोज 2 हजार नवे रुग्ण या काळात सापडत होते. त्यात रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याचे चित्र होते. ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर खाटा कमी पडत असल्याचे चित्र असल्याने शहरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कोविड सेंटर वाढविण्यात आले. तसेच आयसीयू आणि व्हेंटिलेटर वाढविण्यात आले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शहराच्या विविध भागात नवनवे रुग्ण आढळत होते आणि रुग्णसंख्या केवळ आठ दिवसांतच दुप्पट होत असे. नंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबरअखेरीस आता रुगणसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हा तब्बल 200 दिवसांवर गेल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, अद्याप संकट पूर्णपणे संपलेले नाही याची जाणीव प्रशासनाकडून दिली जात आहे.