पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आले आहेत. त्यांना मणिपूर हिंसाचारावरून काळे झेंडे दाखवून काँग्रेसकडून विरोध करण्यात आलेला आहे. काँग्रेसकडून हे आंदोलन पुण्यातील अभिनव चौकामध्ये करण्यात आले. या आंदोलनाचे आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी यांनी नेतृत्व केले. यावेळी बळजबरीने पोलिसांचा वापर करून आम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे. पोलिसांचा उपयोग करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नव्हे तर क्राईम मिनिस्टर, 'मोदी गो बॅक' असे पोस्टर हातात घेऊन निषेध केला जात आहे.
मोदी यांच्या दौऱ्याला विरोध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या आघाडीने आधीच आपली भूमिका जाहीर केली होती. त्याप्रमाणे आज आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी हे कार्यकर्ते अभिनव चौकात काळे कपडे घालून त्याच्यावर मणिपूरचा उल्लेख करून आंदोलन करत होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर पायी चालत निघालेले असताना त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अभिनव चौकात पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ झटापट चालू होती. अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिलेली आहे.