पुणे - कोरोनाबाधितांवरील उपचारांमध्ये प्लाझ्माची गरज असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी पुण्यातील वंदे मातरम संघटना, युवा फिनिक्स सोसायटी यांच्यावतीने प्लाझ्मा प्रीमियर लीग ही अनोखी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर, या संस्थेच्या माध्यमातून प्लाझ्मा स्टाईक, हा उपक्रम देखील हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्लाझ्माचा तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे आणि वंदे मातरम संघटनेचे विद्यार्थी प्रमुख संचित कर्वे हेही वाचा -पिंपरी चिंचवडच्या चार रुग्णालयात उभारण्यात येणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट
स्पर्धेत 9 संघांनी घेतला आहे सहभाग
प्लाझ्मा प्रीमिअर लीग ही स्पर्धा गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत संस्थांसाठी होत आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढ जरी होत असली, तरी बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असताना देखील बरे होणारे रुग्ण प्लाझ्मादानसाठी पुढे येत नाही. या स्पर्धेत नऊ संघांनी सहभाग घेतला आहे. 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीत कोण - कोणत्या मंडळांनी किती जणांना प्लाझ्मा मिळवून दिला, हे सर्व पाहिले जाणार आहे. किमान शंभर जणांना प्लाझ्मा मिळवून देण्याची स्पर्धेत अट आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येणाऱ्याला 50 हजार रुपये आणि ट्रॅफी, दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्याला 30 हजार आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्याला 20 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे, अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे यांनी दिली.
प्लाझ्मा कॉल सेंटर आणि प्लाझ्मा स्टाईक उपक्रमाला देखील सुरवात
प्लाझ्मा प्रिमीअर लीगबरोबरच वंदे मातरम संघटनेच्यावतीने प्लाझ्मा कॉल सेंटर आणि प्लाझ्मा स्टाईक या उपक्रमाला देखील सुरवात झाली आहे. यात 20 ते 45 वयोगटातील कोरोनातून बरे झालेल्यांची माहिती महापालिकेच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आहे. संघटनेतील प्रत्येकजण दिवसभरात 100 जणांना कॉल करून प्लाझ्मा दानसाठी आवाहन करत असतो. या उपक्रमाद्वारे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त दाते मिळवण्याचा प्रयत्न आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात प्लाझ्माचा तुटवडा आहे, त्यामुळे अधिकाधिक दात्यांनी पुढे येऊन प्लाझ्मादान करावे म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. दिवसभरात फक्त 4 ते 5 दातेच प्लाझ्मादानसाठी पुढे येत आहे. जास्तीत जास्त दात्यांनी प्लाझ्मादानसाठी पुढे यावे, असे आवाहन देखील यावेळी जामगे यांनी केले.
हेही वाचा -'देशभर एकच किंमत जाहीर करा, अन्यथा गाड्या अडवू'