पुणे : पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून अमली पदार्थांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या कारवाईमध्ये दोन लाख 23 हजारांच्या अफू बोंडांसह एकूण 22 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी जगदीशप्रसाद पुनमाराम बिष्णोई )(वय-32), तानाजी बालाजी सातपुते (वय-23), अभिनेश चाईसिंह पौळ (वय-47) यांना अटक केली आहे.
सापळा रचून आरोपींना केली अटक -
चाकण येथून अफुची दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर एका ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची, माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे सापळा लावला. चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या या ट्रकला थांबवून ट्रकचालक आरोपी बिष्णोई याच्याकडे पोलिसांनी चौकशी करत ट्रकची पाहणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये अफुची बोंडे मिळून आली. त्यानंतर चिंबळी फाटा येथील हॉटेल आराध्या व हॉटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली.