पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत 6.420 टन रक्तचंदनाने भरलेला मालमोटार, एक चारचाकी मोटार व मोबाईल फोन, असा एकूण 6 कोटी 52 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांचे चार साथीदार फरार आहेत.
निलेश विलास ढेरंगे, एम. ए. सलिम, विनोद प्रकाश फर्नांडिस, झाकीर हुसेन अब्दुलरेहमान शेख, मिन्टोभाई उर्फ निर्मलसिंग मंजितसिंग गिल, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अशी केली मोठी कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाईक वंदु गिरे आणि पोलीस हवालदार राजेंद्र काळे 12 मे रोजी गस्त घालत होते. ताथवडे येथे त्यांना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी मोटार दिसली. त्या मोटारीला पुढे नंबर प्लेट नव्हती व मागील नंबर प्लेट ही अर्धवट तुटलेली होती. काहीजण चारचाकीजवळ थांबले असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यातील तिघांना पकडले आणि त्यांच्याकडे विचारणा केली. दरम्यान, पकडलेल्या तिघांच्या मागे थांबलेले दोघेजण अंधारात पळून गेले. त्यामुळे पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर निलेश ढेरंगे याच्या मोबाईल फोनची पाहणी केली. त्यावेळी त्यात रक्त चंदनाने भरलेल्या मालमोटारीचे फोटो दिसले.