पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरातील बुलेट चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारासह साथीदाराला गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 लाख 70 हजार रुपयांच्या 10 बुलेट, 2 एफ झेड, केटीएम आणि पल्सर एक अशा 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हेमंत राजेंद्र भदाणे (वय 24, रा. सातपूर नाशिक) आणि योगेश सुनील भामरे (वय 24, रा. धुळे) याला पोलिसांनी अटक केली आहे. भामरेच्या मदतीने आरोपी हेमंत हा मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे या भागात 2 लाखांची बुलेट अवघ्या 15 ते 20 हजारांचा विकत असे. दोघेही फेसबुकवरून ग्राहक शोधून डील करत होते. कागदपत्र नंतर देतो असे म्हणून बुलेट कवडीमोल किंमतीत ग्राहकाला विकायचे, असे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी हेमंत राजेंद्र भदाणे यांच्यावर 37 गुन्हे दाखल आहेत.
2 लाखांची बुलेट 15 हजारांना विकणारा 'बुलेट राजा' जेरबंद; फेसबुकवरून करायचे डील - पुणे गुन्हेगारी विषयी बातम्या
पिंपरी-चिंचवड परिसरातील बुलेट चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 बुलेट, 2 एफ झेड, केटीएम आणि पल्सर अशा एकूण 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
मात्र, तो आणखी माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. तेव्हा पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने नाशिक येथील बुलेट चोरी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे कबूल केले. यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक शहरातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. लॉकडाऊनमध्ये नाशिकहून पुण्यात मिळेल त्या वाहनाने आरोपी हेमंत राजेंद्र भदाणे यायचा. रस्त्याच्या किंवा घराच्या बाहेर पार्क केलेली बुलेट तो चोरी करायचा. असे करून अवघ्या काही महिन्याच्या कालावधीत त्याने शहरातील दहा बुलेट चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, आरोपी हेमंत हा पुण्यातील चोरलेल्या बुलेट, साथीदार योगेश सुनील भामरे याच्या मदतीने फेसबुकवरून ग्राहक शोधून विकत होता. तो बीड, उस्मानाबाद, धुळे, अहमदनगर, येथील लोकांना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून अवघ्या 10 ते 15 हजारात 2 लाखांची बुलेट विकत होता. फेसबुकवरील डील निश्चित झाल्यानंतर सर्व संभाषण आरोपी डिलीट करत असे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी साथीदार योगेशला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा, युनिट १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, तसेच पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांनी केली.