महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2020, 12:01 PM IST

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन वर्षे पूर्ण; गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आज दुसरा वर्धापन दिन आहे. पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही चांगल्या पद्धतीचे काम पोलिसांकडून होताना दिसत आहे.

Commissionerate of Police
पोलीस आयुक्तालय

पुणे - 15 ऑगस्ट 2018 ला पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. आज त्याचा दुसरा वर्धापन दिन असून गेल्या दोन वर्षात शहरात गुन्हेगारीचा चढता आलेख कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही चांगल्या पद्धतीचे काम पोलिसांकडून होताना दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन वर्षे पूर्ण

आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर आर.के पद्मनाभन यांनी पहिले पोलीस आयुक्त म्हणून आयुक्तालयाचा पदभार घेतला. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक निर्णय घेतले. हिंजवडी येथील वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना संगणक अभियंत्यांकडून पाठिंबा आणि कौतुक मिळाले. मात्र, त्यांच्या कार्यकाळात काही महिने गुन्हेगारी वाढली होती हे नाकारता येणार नाही. काही महिन्यातच त्यांची बदली झाली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आयुक्तालयाचा चार्ज घेतला. त्यांच्या कार्यकाळात एटीएम फोडण्याचा घटनांनी डोके वर काढले होते. मात्र, वेळीच अनेक गुन्हे उघड करत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, आत्महत्या, वाहनांची तोडफोड, दरोडे, टोळी वर्चस्वातून होणारे खून यांची संख्या मोठी आहे. असे अनेक गुन्हे दररोज विविध पोलीस ठाण्यात दाखल होतात. पूर्वीच्या तुलनेत आता गुन्ह्यांचा संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळत असून गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात गुन्हेगारी आटोक्यात आली आहे. या काळात पोलिसांनी 13 टोळ्यांवर कारवाई केली आहे. अनेक कुख्यात आरोपींवर पोलिसांचे लक्ष असून अनेकांवर कारवाईही झाली आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे कामगिरीमध्ये सातत्य ठेवणार आहोत, असे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

मागील अडीच वर्षांचा गुन्हेगारी आलेख -

जानेवारी ते जुलै 2020
1) खून - 37
2) लैंगिक अत्याचार - 72
3) आर्म ऍक्ट - 35

जानेवारी ते डिसेंबर 2019
1) खून - 68
2) लैंगिक अत्याचार - 160
3) आर्म ऍक्ट - 45

जानेवारी ते डिसेंबर 2018
1) खून - 72
2) लैंगिक अत्याचार - 148
3) आर्म ऍक्ट - 72

ABOUT THE AUTHOR

...view details