पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहरातही कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सामुदायिक प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रास कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. शहरात आणखी कडक नाकाबंदी करण्यात येत असून शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहेत. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत. तर, हे आदेश २७ एप्रिलपर्यंत लागू असतील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
या आदेशातून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, पोलीस विभागाचे, राज्य, केंद्रीय विभागांचे कर्मचारी, वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि वाहनांना वगळण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदर आदेशातून वगळण्यात आली आहे.
खालीलप्रमाणे सूचनाही देण्यात आल्या आहेत -
१. नमूद प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत सुरू ठेवाव्यात. तसेच आपली एटीएम केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.
२. सदर काळात सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या कालवधीतच दूध, भाजीपाला, फळे यांची किरकोळ विक्री सुरू राहील. सदर विक्री मनपा मार्फत दिलेल्या जागांवरच राहिल.
३. सदर काळात अत्यावश्यक इतर सामान जसे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या कालवधीतच सुरू राहतील