बारामती - पुणे जिल्ह्यात पेट्रोल पंपांतील पेट्रोल आणि डिझेल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ ट्रक,२ कॅन, मेटल कटर, पाईप, मोबाईल असा १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्रीराम लाला काळे, दशरथ भीमा काळे, नाना गोविंद पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. नुकतेच इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे साडेसात लाख रुपयांचे डिझेल तर लासुरणे येथे सव्वा लाख रुपयांचे डिझेल चोरट्यांनी चोरले होते. पंपामधून डिझेल चोरले जात असल्याने नागरिकांची देखील चिंता वाढली होती.मात्र पोलिसांनी ही टोळी जेरबंद केल्याने व्यवसायिकांना देखील दिलासा मिळणार आहे.
विशेष पथक नेमण्यात आले होते
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यासंदर्भात विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्सपोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.