पुणे :विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाचे सर्वोच्च न्यायालयाने समर्थन केले आहे. परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन पुढील वर्गात पाठवता येणार नाही. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, असे आदेश देत परीक्षा न घेता पदवी देण्याची राज्य सरकारांची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने परीक्षा न घेण्याची भूमिका घेतली होती. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांनी अशी भूमिका घेतली होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विविध विद्यपीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून मोठा वाद सुरू होता. राज्य सरकारने या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत परीक्षा न घेण्याची भुमिका घेतली होती. मात्र, या निर्णयाला माजी सिनेट सदस्य असलेले पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.