पुणे - पितृपंधरवडा संपल्यानंतर नवदुर्गाचा महत्त्वाचा सण मानला जाणारा नवरात्र सुरू झाला आहे. यानिमित्ताने ग्रामीण भागातील महिलांनी घराची साफसफाई करण्याची तयारी सुरू केली आहे. घरातील गोधड्या, रजई, चादरी, जुनी कपडे धुन्यासाठी खेड तालुक्यातील भीमा व भामा नदीच्या संगमावर महिलांची लगबग सुरू आहे. लक्ष्मीचा वास घरात राहावा, चांगले धन-धान्य संपदा लाभावी यासाठी ग्रामीण भागातील नागरिक घराघरात साफसफाई, कपडे-भांडी धूवून सर्व घर स्वच्छ करतात.
घराघरात दसरा-दिवाळीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. भीमा व भामा या दोन्ही नद्यांच्या पाण्यात कडाक्याच्या ऊन्हात खेड तालुक्यातील विविध गावातील अनेक कुटुंब, महिला नागरिक, लहान मुले मिळून याठिकाणी आपापल्या घरातील कपडे-भांडी धुण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहे. बाजूलाच असणाऱ्या खडकाळ दगडांवर रंगबिरंगी कपड्यांनी भीमा व भामा नदीचा संगम नदी फुलून गेला आहे.