पुणे - आपल्याला रोगाशी लढायचं, रोग्याशी नाही' ही कोरोनाची टॅगलाईन आहे. परंतु, सध्या समाजात याउलट होताना दिसत आहे. बाधित रुग्णावर, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात सापडलेल्या कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या वाहनचालकाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कोरोनाने त्यांचा व्यवसायच हिरावला आहे.
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला सापडला होता. दुबईहून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. हे दाम्पत्य दुबईहून विमानाने मुंबईला आले. तेथून पुण्याला टॅक्सी करून आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये पुण्यातील टॅक्सी चालकाचाही समावेश होता.
पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या चालकानी तब्बल महिनाभर नायडू रुग्णालयात उपचार घेतले आणि बरे होऊन ते घरी परतले. परंतु, घरी परतल्यानंतरही कोरोनाने त्यांना सोडले नाही. घरी आल्यानंतर त्यांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले.