शमीमा अख्तर हिचे सुमधूर आवाजातील पसायदान व भक्तिगीत पुणे : महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण म्हणजे पालखी सोहळा आणि याच जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक हे वारीत सहभागी झाले आहेत. या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीचा माणूस हा या वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळतो.
बालपण दहशतीच्या सावटात गेले :शमीमा ही मूळची काश्मीरची असून ती काश्मीरच्या बांदीपुरा भागात लहानाची मोठी झाली आहे. तिचे संपूर्ण बालपण हे दहशतीच्या छायेत गेले. एका दहशतवादी हल्ल्यात तर आईला गोळी लागली, सख्खी आत्या मारली गेली. तेव्हा मात्र लहान असलेल्या शमीमाला आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची पुसटशीही कल्पना नव्हती. दहशतीच्या छायेतच लहानची मोठी झाली असून आता हीच शमीमा धर्म, जात, भाषा या सगळ्यांच्या पलीकडे जात आपल्या आवाजाने शांतता आणि एकतेचा संदेश देत आहे.
अशी आली गायन क्षेत्रात :शमीमाला घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. तिचे आजोबा काश्मीरमधील प्रसिद्ध संत कवी. त्यामुळे लहानपणापासूनच संगीताचे सूर सतत कानावर येत होते. आजोबांच्या कव्वाली ऐकत शमीमावर गाण्याचे संस्कार होत होते. आजोबांचे गाणं ऐकता-ऐकता तीही कधी गायला लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. त्यानंतर आई-वडील शाळेतील शिक्षक यांच्या पाठिंबामुळे तिचं गाणं आणखी बहरत गेलं. पुढे जाऊन तिने लखनऊ विद्यापीठातून गाण्याची रीतसर पदवी घेतली. कालांतराने शमीमा पुण्यात आली आणि इथेच तिने मराठी गाणी आपलीशी केली.
विठ्ठलभक्तीत झाली दंग:संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात असताना शमीमाने विठ्ठलाचे अभंग म्हणत आपल्या आवाजाची जादू दाखवून दिली. 'पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल' म्हणणारी शमीम या अभंगासोबतच विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होताना यावेळी पाहायला मिळाली.
हेही वाचा:
- Nath Maharaj Palkhi: नाथ महाराजांची मानाची तिसरी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
- ST Buses For Pandharpur Yatra 2023: श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बसेस सोडणार- मुख्यमंत्री शिंदे
- Ashadhi Wari 2023 : तुकोबांची आधुनिक पालखीचे आज देहूतून प्रस्थान, पालखी कधी कुठे राहील मिळणार माहिती