पुणे Parliament Attack : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षा भेदून दोन तरुणांनी गॅलरीतून आत उड्या मारल्या होत्या. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. याप्रकरणी ज्या सहा तरुणांनी हा हल्ला केला आहे त्यात एक जण लातूरचा असून त्याचं नाव अमोल शिंदे आहे. तर अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याचं घटनेचे अभ्यासक असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी सांगितलं.
अमोल शिंदेला बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता: असीम सरोदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहिलं की, अमोल शिंदे याने संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत. ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश कुणाला दुखावण्याचा आणि इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता. तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव करून देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी.