पुणे -लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातल्या परिवर्तन या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सोळाव्या लोकसभेतील खासदारांचे गेल्या पाच वर्षातील रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले आहे. संस्थेने यासाठी खास वेबसाईट बनवली आहे. आपण ज्यांना निवडून देतो ते संसदेत जाऊन नेमके काय करतात याचा लेखाजोखा या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
सजग मतदार ही प्रगल्भ लोकशाहीसाठीची गरज आहे. त्यामुळेच मतदान करताना केवळ जाहिरातबाजी आणि घोषणांच्या भपक्यात मतदाराने वाहत जाऊ नये, तर उमेदवाराने आधी केलेल्या कामाचा पूर्ण आढावा घ्यावा. हेच लोकशाहीत अपेक्षित आहे. म्हणूनच खासदारांनी निवडून आल्यापासून काय काय केले याचा एक वस्तुनिष्ठ लेखाजोखा या संस्थेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन संस्थेने लोकसभेमध्ये खासदारांकडून केल्या जाणाऱ्या कामांचा तसेच त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतलेला आहे.
परिवर्तन सामाजिक संस्थेकडून करण्यात आलेले सर्वेक्षण
२०१४ ते २०१९ या पाच वर्षातला हा अहवाल आहे. लोकसभेतील उपस्थितीचा विचार केला तर राष्ट्रीय सरासरी ही ६८.५ टक्के इतकी आहे आणि महाराष्ट्राची सरासरी ६९ टक्के एवढी आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांची राष्ट्रीय पातळीवर २५० इतकी सरासरी आहे तर महाराष्ट्राची सरासरी ५३३ इतकी आहे. लोकसभेत राष्ट्रीय पातळीवर खासदारांकडून सरासरी दोन विधेयक मांडली गेली आणि महाराष्ट्राचा विचार केला तर ही संख्या चार आहे. लोकसभेत चर्चांमध्ये राष्ट्रीय स्तरावर विचार केला तर ६४ टक्के एवढी तर महाराष्ट्राचे सरासरी ६८ टक्के एवढा सहभाग राहिला आहे. खासदार निधीचा वापर राष्ट्रीय स्तरावर सरासरी १८ कोटी एवढा केला गेला आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी सरासरी १६ कोटी निधीचा वापर केला आहे.