मंचर (पुणे) : कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या, मात्र ऑक्सिजन बेड मिळण्यास उशीर होत असलेल्या रुग्णांना मंचर येथील लोकविश्व प्रतिष्ठान व संतोष वायाळ मित्रपरिवाराच्या वतीने ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत वापरासाठी देण्यात येत आहे. अशी माहिती लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली आहे.
दोन आठवड्यात 15 रुग्णांना फायदा
कोरोनाचे गंभीर लक्षणे असणाऱ्या काही रुग्णांमध्ये ठराविक कालावधीनंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी होण्यास सुरुवात होते. सद्यस्थितीत सर्वत्रच कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. या कालावधीत ऑक्सिजन अभावी रुग्णाची परिस्थिती अति गंभीर होण्याची शक्यता वाढत आहे. याबाबीचा विचार करून लोकविश्व प्रतिष्ठान व संतोषभाऊ वायाळ मित्रपरिवाराने ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत मोफत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सुरू करून जेमतेम दोन आठवडे झाले असून, या दोन आठवड्यात ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील 15 रुग्णांना या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मोफत वापरासाठी देण्यात आले असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.