महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2020, 9:14 PM IST

ETV Bharat / state

'सरकारने विजेचा शॉक दिला, आता आपण मतदानाचा शॉक देऊ'

राज्यात सध्या वाढीव वीज बिलावरून राजकारण सुरू आहे. विरोधी पक्षांकडून वारंवार आंदोलने केली जात आहेत.त्यातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी महाविकास आघाडीवर वीज बिलासह इतर काही मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सरकार टीका
देवेंद्र फडणवीस यांची सरकार टीका

पुणे- राज्यात सध्या लॉकडाऊनकाळातील वाढीव वीज बिलाचे राजकारण तापू लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्याला विजेचा शॉक दिला, आता आपण या सरकारला मतदानाचा शोध देऊ, अशी टीका फडणवीस यांनी पुण्यात केली आहे.

भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न-

या सरकारने मराठा आरक्षणाबाबत घोळ निर्माण करून ठेवला आहे. केवळ दोनच आरक्षण असे होते एक तामिळनाळू आणि दुसरे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षण उच्चन्यायालयात टिकले. दुसरी कोणतेही टिकले नाही. मराठा आरक्षण उच्च न्यायालय जातांना घटनापीठाकडे स्थगिती देते देण्यात आली. त्या दिवसापासून सरकारची आरक्षण प्रश्नी केवळ चालढकल चालू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्येही या सरकारने घोळ करून ठेवला आहे. एकीकडे मराठा समाजाला, तर दुसरीकडे अन्य समाजातील विद्यार्थ्यांना अडकवून ठेवले आहे. एवढंच नाहीतर एक प्रकारे समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

जयंत पाटील हुशार नेते -

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, आज मला एका गोष्टीची खात्री झाली की पदवीधर निवडणूक आपणच जिंकणार आहोत, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदवीधर निवडणुकीत बोगस मतदारांची नोंद झाली आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून मला मला वाटलं की आपण जिंकत आहोत. कारण जयंत पाटील हे एक हुशार नेते आहेत, म्हणून त्यांनी आत्तापासूनच कव्हर फायरिंग सुरू केली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम नाहीतर मतपत्रिका आहेत. म्हणून जयंत पाटील हे कव्हर फायरिंग करत आहेत, असा टोला यावेळी फडणवीस यांनी पाटील यांना लगावला.

पंतप्रधान सामान्य व्यक्तीची चिंता करत होते-

कोरोनाच्या काळात इतर राजकीय पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव ठेवायचे. मात्र पंतप्रधान सामान्य माणसाची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून त्यांना सामान्यांचे जीवन सुखकर केले. याउलट राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे, महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तुमच्या,आम्ही आमच्या घरी सुखरुप राहा एवढेच सांगितले, ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने जनतेला मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाट बिले दिली. दोन खोल्यासाठी वीस हजार बिल आले, जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध असल्याचेही म्हणत फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

जाणीवपूर्वक भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे-

कुठल्याही घटकाला मदत न करणारी हे सरकार आहे. कोरोना आणि अतिवृष्टी काळात देशातील छोट्या छोट्या राज्यांनी त्यांच्या जनतेला मदत केली. पण या सरकारने काहीही मदत केले नाही. फक्त उठसूट केंद्र सरकारवर टीका केली. या सरकार विरुद्ध बोललो तर जेल मध्ये टाकले जात आहे. लोकशाहीत विरोधात बोलण हक्क आहे. आम्ही सत्तेत होतो आमच्या विरुद्ध रोज लिहिल जायचे, बोलले जायचे, समाज माध्यमांवर रोजची टिंगल-टवाळी केली जायची. मात्र, आम्ही कोणालाही जेलमध्ये टाकले नाही. पण हे सरकार म्हणजे 'आमच्या विरोधात बोलला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू' अस धोरण राबवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

आज भाजपच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक आयपीएसच्या कलम लावून गुन्हा दाखल केले जात आहेत. परंतु तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणारे नाही. संघर्ष करणारा हा पक्ष आहे. आम्ही आमच्यासाठी नाहीतर जनतेसाठी लढत आहोत. आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.


ABOUT THE AUTHOR

...view details