पुणे- आळंदी हे विवाह करु इच्छितांचे आवडते ठिकाण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण पळून जाऊन लग्न करण्यासाठी, कमी खर्चातील लग्नासाठी किंवा अगदी धूमधडाक्यात होणाऱ्या लग्नांसाठीसुद्धा आळंदी हे प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. पण सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करता येणार आहे.
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी राज्यात चौथा लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये शासनाने खबरदारी म्हणून लग्न समारंभास अटी-शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. पण आळंदी येथे स्थानिकांनाच लग्नाची परवानगी असणार आहे. या बाबतचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
शासनाने लग्न समारंभास अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. या परवानगीनुसार आळंदीत बाहेरून अनेक लोक वऱ्हाडीसह लग्नासाठी येत आहेत. सद्यघडीला आळंदीत बाहेरून येणाऱ्यांची संख्या किमान अडीच हजाराहून अधिक आहे. यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची खबरदारी म्हणून शहरात फक्त स्थानिकांनाच विवाह सोहळा तेही घरातच संपन्न करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.