पुणे - कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, यासाठी वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी झूम-मीटिंग अॅप्लिकेशनद्वारे दररोज तीन तासांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे.
वाबळेवाडी शाळेत ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू वाबळेवाडीच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद शाळा कमी दिवसात नावारूपाला आली आहे. नवनवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन जिल्हा परिषदेच्या या शाळेने जागतिक पटलावर तिसरा क्रमांक मिळवला आहे. सध्या कोरोनाच्या सावटामुळे ऐन परीक्षेच्या दिवसात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर उपाय शोधून विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर सुरू केला आहे.
हेही वाचा -EXCLUSIVE : 'कोरोना' उद्रेक, अन् चीनमधील अनुभव.. पाहा विशेष मुलाखत!
इयत्ता सहावी ते नववीच्या वर्गांतील ११६ विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत सहभाग नोंदवला आहे. दिवसातून तीन वेळा हे ऑनलाईन वर्ग घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणाप्रमाणेच शिक्षण मिळत आहे. शाळा बंद असूनही शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही.
सर्व विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू करण्यासाठी झूम-मीटिंग अॅप्लिकेशनची चाचणी यापूर्वीच घेण्यात आली होती. त्यानुसार सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आयडी आणि पासवर्ड काढून वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आता या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे यशस्वी शिक्षण सुरू झाले आहे.