पुणे -गेले काही दिवस वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा, बुरशी, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दौंड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कसेबसे हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी ते विविध प्रकारची महागडी औषधे फवारणी करून घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कांद्याचे होत आहे नुकसान
मागील काही महिन्यांत कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकातून चांगला आर्थिक फायदा झाला होता. यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याचे महाग बी, रोपे विकत घेऊन आपल्या शेतात लावले. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याची परीस्थिती निर्माण झाली. कांदा पिक पिवळे पडत आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ढगाळ वातावरणामुळे रोग
ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोग पडत असल्याने वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे औषध विक्रेते जोमात आणि शेतकरी मात्र कोमात, अशी अवस्था झाली असून, शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे. शेतकरी अधिक अडचणीत येताना दिसत आहे.